बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार? टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?

Bangladesh T20 World Cup 2026: बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतात संघ पाठवण्यास नकार देत आयसीसीला एक पत्र पाठवण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : भारत, बांगलादेश, आयपीएल, टी 20 वर्ल्ड कप आणि मुस्तफिजूर रहमान यामुळं संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आदेशानुसार कोलकाता नाईट रायडर्सनं मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. याला कारण होतं बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळं सोशल मीडियावरुन मुस्तफिजूर रहमानला झालेला विरोध होय. या कारणामुळं बीसीसीआयनं मुस्तफिजूर रहमानला संघातून काढा असा आदेश केकेआरला दिला. यानंतर भारतानं बांगलादेशचा ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यानचा प्रस्तावित दौरा देखील निश्चित नसल्याचं सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्डातील वादानं नवं टोक काघटलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं अधिकृत पत्रक जाहीर करत टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील बांगलादेशच्या मॅचेस भारताबाहेर खेळवण्याची मागणी केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार आयसीसी बांगलादेशच्या मागणीला मंजुरी देऊ शकते.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आयसीसी बांगलादेशचे सामने श्रीलंकेत खेळवू शकते. सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे तीन सामने कोलकाता येथे आणि एक सामना मुंबईत होणार आहे. बांगलादेश क गटात असून त्यांचे सामने 7 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारीला होणार आहेत. रिपोर्टनुसार येत्या दोन दिवसात निर्णय़ घेऊ शकते.
या सगळ्या घडामोडींदरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाची बैठक ढाकामध्ये झाली. त्या बैठकीत टी 20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ भारतात पाठवायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांच्या पत्रात म्हटलं की भारतातील सध्याच्या वातावरणात खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी असुरक्षित स्थिती दिसून येते. यामुळं टी 20 वर्ल्डकपचे सामने भारताबाहेर खेळवण्यात यावेत. बीसीबीनं आयसीसीनं लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.
बीसीबीचा मोठा निर्णय
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मुस्तफिजूर रहमान ला आयपीएलमधून काढून टाकण्यात आल्यानं हा निर्णय घेतला. आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं 9.20 कोटी रुपयांना मुस्तफिजूर रहमानला खरेदी केलं होतं. मात्र, भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंधात तणावात वाढ झाली आहे. मुस्तफिजूर रहमानवरुन शाहरुख खानला धमकी देखील आली होती. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केकेआरला मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे. टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार आहे, तर फायनल 8 मार्चला होणार आहे.






