
सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” मला प्राप्त झाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक क्षणांनी भरलेली बाब आहे.
या पुरस्काराने यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आणि लोकप्रतिनिधी गौरविण्यात आले आहेत. ज्यामध्ये बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. आबा पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा.रे.पाटील, भाऊसाहेब कुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चुभाऊ कडू, नीलमताई गोरे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, नितीनजी गडकरी, भारतीताई पवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. अशा दिग्गज नेत्यांच्या यादीत माझेही नाव जोडले जाणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
समाजवादी विचारांचे अध्वर्यू स्व. आमदार माधवराव लिमये यांचे आयुष्य हे जनतेसाठीच्या संघर्षाचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून पुढेही जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळत आहे.
हा सन्मान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा.ना. अॅड. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वीकारण्याचा योग आला, हीदेखील माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब आहे. नाशिक येथील प.सा. नाट्यमंदिर, टिळक पथ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा मिळाल्याने पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे,आमदार सीमाताई हिरे,महापौर हिमगौरी आडके,प्रा.दिलीपराव फडके,सुनील कुटे,संजय करंजकर,सुरेश गायधने,सचिन महाजन,शोभाताई नेरलिनार उपस्थित होते..!
हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक नसून धाराशिवच्या जनतेचा सन्मान आहे. ज्या शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवले, त्यांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या प्रेमाचा हा गौरव आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना त्या प्रत्येक नागरिकाचे ऋण मी मनापासून मान्य करतो. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या स्वप्नांना संसदेत आवाज देण्याचा माझा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने राहील.!
Shivsena UBT
Om Rajenimbalkar – ओम राजेनिंबाळकर






